जामखेड: जामखेड शहरातील शिवाजीनगर परिसरातून एक धडक देणारी बातमी समोर आली आहे. केवळ १५ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे शहरात तसेच तालुक्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलगी भक्ती गणेश गायकवाड (वय १५, रा. शिवाजीनगर, जामखेड) अशी आहे. तिच्या आत्महत्येबाबतची माहिती तिचे चुलते मोहन विनायक गायकवाड (वय ३६, रा. मोहा) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात दिली. त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, माझ्या भावाची मुलगी भक्ती हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईक तुकाराम भोरे यांनी फोनवरून याची माहिती दिल्यानंतर मी तत्काळ जामखेड ग्रामीण रुग्णालयात पोहोचलो. मात्र डॉक्टरांनी भक्तीला तपासून ती मृत असल्याचे सांगितले.
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत असून मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.