जामखेड: जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी ३१ लाख ९६ हजार ५ रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. या निर्णयामुळे बाजारात शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या योजनेस गती दिली. परिणामी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला.
या प्रकल्पासाठी एकूण १ कोटी २७ लाख ८४ हजार १७ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्के म्हणजे ६३ लाख ९२ हजार ९ रुपये शासन अनुदान अनुज्ञेय असून, त्यातील पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजेच ३१ लाख ९६ हजार ५ रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी पुणे येथील पणन संचालनालयामार्फत थेट बाजार समितीच्या आधार संलग्नित खात्यात जमा केला जाणार आहे.या निधीच्या उपलब्धतेमुळे शेतकरी भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळणार असून, लवकरच आधुनिक सोयींनी सुसज्ज असे भवन उभे राहण्याची अपेक्षा आहे.
शेतकरी भवनामुळे काय होणार फायदे?
शेतकरी भवन उभारल्यामुळे बाजारात शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुक्कामाची सोय उपलब्ध होईल, तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. बाजारात दीर्घकाळ थांबावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी योग्य जागा मिळेल. परिणामी, शेतीमाल विक्रीसाठी येताना होणारा त्रास, गैरसोय आणि अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.जामखेडसह परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत येतात. मात्र, मुक्काम व मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन शेतकरी भवन उभारल्यामुळे ही समस्या दूर होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व खर्च यांची बचत होणार आहे.
शासनाचा व्यापक उद्देश; जामखेडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, त्या ठिकाणी अशा सुविधा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बाजार व्यवस्थेला बळकटी देत शेतकऱ्यांना सुसज्ज सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.










