जामखेड : राज्याचे ग्रामविकासमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी (दि.१७) सायंकाळी सीना नदीवरील नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या जवळा बंधाऱ्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
गत काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या महापुरात जवळा येथील खडकी बंधाऱ्याचे भराव वाहून गेले असून, शेतजमिनी आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री गोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून घेतले.
गोरे यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी आपल्यावर ओढवलेल्या संकटाची हकिकत त्यांच्यासमोर मांडली. पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक नुकसान भरून काढण्याबाबत त्यांनी मदतीची मागणी केली.
पालकमंत्रींनी शेतकऱ्यांच्या व्यथा शांतपणे ऐकून घेतल्या व प्रशासनाला “तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत पोहोचवावी” असे स्पष्ट आदेश दिले. तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नदीकाठावरील संरक्षणबांध व बंधाऱ्यांचे तातडीने मजबुतीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
याप्रसंगी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, कृषी अधिकारी, स्थानिक सरपंच, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना धीर देत पालकमंत्री म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी बांधील आहे. मदतीत कुठेही विलंब होऊ देणार नाही.