जामखेड: नगर – जामखेड रोडवरील सारोळा बद्धी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान आज मुसळधार पावसामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला. या दुर्घटनेमुळे जामखेड ते नगर दरम्यानचा मुख्य संपर्क मार्ग बंद झाला असून या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. पुलावर काम सुरू असताना पाण्याचा जोर वाढल्याने पुलाचा काँक्रीट भाग वाहून गेला. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, काम सुरू असले तरी सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. तथापि, प्रशासनाने हवामानाचा अंदाज पाहून काम बंद करण्याचा निर्णय घेण्यास विलंब झाला, अशी चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गांची सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. काही जणांना २०-३० किलोमीटर अतिरिक्त अंतर पार करावे लागत आहे.हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.