जवळा येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश

Spread the love

जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळा येथे रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक तथा ज्योती क्रांती समूहाचे संस्थापक-अध्यक्ष अजिनाथ हजारे यांच्या वतीने रविवार (दि. ८ मार्च) रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा कायम राहावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर रोजा (उपवास) पाळतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करून उपवास सोडतात. या पार्श्वभूमीवर जवळा येथील मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी सुमारे सात वाजल्यानंतर अजिनाथ हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मस्जिदमध्ये उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना फलाहाराचे वाटप केले. यावेळी सर्वांनी एकत्र बसून इफ्तार घेत रमजान महिन्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे गावात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे जामखेड तालुका उपाध्यक्ष महेंद्र खेत्रे, सोपान बोराटे, दीपक महाजन, संजय हजारे, सतीश हजारे, अशोक येळवणे, हर्षवर्धन वाळुंजकर, अनिकेत हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनात आयुब शेख, रिजवान शेख, अस्लम शेख, सादिक मुजावर, सादिक शेख, शकूरभाई सय्यद, खलील शेख, बशीर शेख, हमीद सय्यद, आसिफ सय्यद, निजाम शेख, अब्बास भाई शेख, सात्तर भाऊसाहेब, अहमद शेख, आसिफ शेख आदी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

error: