नांदणी नदीला दहा दिवसांत तिसऱ्यांदा महापूर; जवळा-शेळगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली वाहतुक बंद, जनजीवन विस्कळीत

Spread the love

जामखेड|जामखेड तालुक्यातील जवळा परिसराला अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदणी नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील पाणी झपाट्याने वाढल्याने जवळा–शेळगाव मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पाणी केवळ नदीपुरते मर्यादित न राहता गावात शिरकाव करू लागले असून जवळा येथील बाजार तळ भाग आणि स्मशानभूमी परिसर जलमय झाले आहेत. स्मशानभूमीतील पाणी इतके वाढले की अंत्यसंस्काराची प्रक्रिया अडथळ्यात आली आहे. या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकं सतत पावसाचा आणि नदीच्या वाढत्या पाण्याचा अंदाज घेण्यात गुंतले आहेत.

या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी जवळा गावाला भेट दिली. त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, पूरामुळे जर गावातील घरे अडचणीत आली किंवा नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, तर त्यांची तात्पुरती सोय करण्यासाठी ग्रामदैवत श्री जवळेश्वर मंदिराचा भक्त निवास आणि नवीन ग्रामपंचायत इमारतीत निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

नदीचे वाढते पाणी आणि सततचा पाऊस यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना हाती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

मागील १० दिवसांत नांदणी नदीला तब्बल ३ वेळा पूर

नांदणी नदीला अल्पावधीत सलग तीन वेळा महापूर आल्याने जवळा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नदीवरील पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने जवळा–शेळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. पहिल्या पुरात नदीने शेतीत पाणी घुसवून नुकसानीची चाहूल दिली होती. दुसऱ्यांदा आलेल्या पुरात नांदणी नदीवरील बंधाऱ्याच्या दोन्ही साईटचा भरावा वाहून गेले, तर तिसऱ्या पुरात स्मशानभूमी आणि नदीकाठचे अनेक घरांनाही धोक्याचा इशारा मिळाला. या सलग पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, गावकऱ्यांना कायम भीतीच्या छायेत दिवस काढावे लागत आहेत. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असले तरी पावसाचा जोर कमी न झाल्याने नांदणी नदी कधीही उफाळून वाहू शकते, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

Leave a Comment

error: