जमाखेड : मागील काही दिवस हवामान शांत राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, या कालावधीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षता
जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत :
मेघगर्जना किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे.मोकळ्या मैदानात, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे किंवा लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे.जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये.मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे.
धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये; पाण्यात उतरू नये आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत.मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळेवर स्थलांतर करावे व घाटरस्त्याने प्रवास टाळावा.शेतीमाल आणि जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.आपत्कालीन संपर्कासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे – टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ आणि २३५६९४०
दादासाहेब गिते यांनी नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सजग राहण्याचे, सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.