लाडक्या बहिणींसाठी ‘गुड न्यूज’! फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरू; आदिती तटकरे यांची माहिती

Spread the love

जामखेड : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यातील सर्व पात्र महिलांना हा निधी थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाईल. शासनाकडून आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात आली असून निधी वेळेत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या हप्त्यासाठी राज्य सरकारने तब्बल 277 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला असून वितरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लाभार्थी महिलांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का, याची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी मिळाल्यामुळे महिलांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लागत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे. या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत असल्याचेही दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी – 31 मार्चपर्यंत मुदत

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक चुका केल्याचे समोर आले आहे. यामुळे पात्र असूनही काही महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण झाले. ही बाब लक्षात घेऊन शासनाने अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी 31 मार्चपर्यंत दिली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थींनी चुकीची माहिती भरली आहे, त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या प्रक्रियेसाठी अत्यल्प कालावधी शिल्लक असून, उशीर केल्यास योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

ई-केवायसीमुळे लाभार्थी संख्येत घट

महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना मिळणारा सन्मान निधी थांबवण्यात आला आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये चुकीची माहिती भरल्यानेही लाभ बंद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून किंवा आवश्यक दुरुस्ती करून योजना सुरू ठेवणे अत्यावश्यक ठरत आहे.

Leave a Comment

error: