जामखेड: शहरातील कान्होपात्रा नगर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बकऱ्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आकाश रतन जाधव (वय ३२) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून बकऱ्याच्या व्यवसायात कार्यरत होता आणि परिसरात मेहनती व शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता. सोमवारी (दि. ३०) दुपारी तो नेहमीप्रमाणे बाहेरून घरी परतला. घराबाहेर मोटारसायकल लावून तो थेट घराच्या वरच्या मजल्यावर गेला. काही वेळानंतर त्याने छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास नातेवाईक वरच्या मजल्यावर गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृत आकाश जाधव यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कान्होपात्रा नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
समाजाला हादरवणाऱ्या घटना वाढतायत…
अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक, मानसिक ताणतणाव, वैयक्तिक समस्या यांसारखी कारणे यामागे असू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत वेळेत संवाद साधणे आणि मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे.










