जामखेड: साळवे प्रकरण तापले! साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज उद्या रस्त्यावर

Spread the love

जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज गावातील रक्तरंजित घटनेच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाने उद्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खर्डा चौक, जामखेड येथे ‘जामखेड बंद व रस्ता रोको आंदोलन’ पुकारले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर अद्याप सर्व आरोपींना अटक न झाल्याने समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

काय घडलं होत?

२४ ऑगस्टच्या मध्यरात्री नान्नज बाजारतळावर सुनिल साळवे यांच्या कुटुंबीयांवर तलवार, कोयत्यांनी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने २७ ऑगस्टला पाच आरोपींना अटक केली, तर यापूर्वीच एकाला जेरबंद करण्यात आलं होतं. तरीदेखील उर्वरित आठ आरोपी अद्याप फरार असल्याने समाजाचा आक्रोश अधिक वाढला आहे.

घटनेनंतर आरोपींपैकी वैभव साबळेने उलट फिर्याद दाखल करून साळवे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनिल साळवे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. या विरोधी फिर्यादीमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आंदोलनाद्वारे समाजाने स्पष्ट मागणी केली आहे की, उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, साळवे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे, त्यांच्या विरोधात दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, सूत्रधाराला अटक करावी तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी.

दरम्यान, साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्याचे पडसाद अजूनही तालुक्यात उमटत असून, नान्नज ग्रामस्थांनी आधीच गाव बंद ठेवून निषेध नोंदवला होता. आता जामखेड बंद आणि रस्ता रोको आंदोलनामुळे परिस्थिती अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समाजाने पुढील काळात मागण्यांची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

error: