जामखेड: साळवे कुटुंब हल्ला प्रकरणात मोठी कारवाई, एलसीबीने आवळल्या पाच जणांच्या मुसक्या

Spread the love

जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज गावात झालेल्या रक्तरंजित हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा शिरकाव करत बुधवारी (२७ ऑगस्ट) पाच फरार आरोपींना अखेर जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खर्डा परिसरात सापळा रचून ही धडाकेबाज कारवाई केली. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोहोचली असून उर्वरित आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक वेगाने हालचाली करत आहे.

२४ ऑगस्टच्या मध्यरात्री आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर तलवार–कोयत्यांनी सशस्त्र हल्ला झाला होता. गावभर थरकाप उडवणाऱ्या या भीषण घटनेत सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील तिघांवर अजूनही पुणे व नगर येथे उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे राजुरी परिसरात ते लपल्याचे पोलिसांना समजताच, स्थानिक गुन्हे शाखेने खर्डा भागात सापळा रचला आणि पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैभव साबळे, कल्याण मोहोळकर, अभयसिंह राजेभोसले, नरेंद्र सोनवणे आणि साईनाथ राजपूत या तरुणांचा समावेश आहे. आरोपींना ताब्यात घेताच तातडीने जामखेड पोलीस ठाण्यात आणून पुढील चौकशीसाठी सादर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर अधीक्षक वैभव कलुबर्म यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

दरम्यान, या घटनेचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत असून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आठ दिवसांत सर्व आरोपींना अटक न झाल्यास जामखेड शहर ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. तर नान्नज ग्रामस्थांनी मंगळवारीच गाव बंद पाळून हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. पोलिसांनी आता मुसक्या आवळायला सुरुवात केली असून उर्वरित आरोपी लवकरच हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: