जमाखेड : जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील प्रगतशील शेतकरी गणेश सोले यांच्या शेतीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट दिली. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जात पाहणी करून अंमलबजावणीचा आढावा घेतला.
यावेळी कर्जत प्रांत अधिकारी नितीन पाटील, कर्जत तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र घुले, जमाखेडचे नायब तहसीलदार मंच्छिन्द्र पाडळे, जमाखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी गणेश सोले यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अशा कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली त्यानुसार कृषी विभागाकडून यांना लकीड्रॉच्या माध्यमातून त्यांना या योजना देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी शेतीमध्ये अधिक उत्पादक बनवली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असून, पाणीसंवर्धन, फलोत्पादन आणि आधुनिक सिंचन प्रणाली याचा शाश्वत शेतीसाठी मोठा उपयोग होत असल्याचे नमूद केले. तसेच इतर शेतकऱ्यांनीही या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी विविध कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, भविष्यातील योजनांची माहिती दिली. शेतीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय मदतीचा प्रभावी वापर केल्यास शेतकरी अधिक स्वयंपूर्ण होऊ शकतील, असा विश्वास रविंद्र घुले यावेळी व्यक्त करण्यात आला.
पूर्वी आमच्या शेतीत पाणीटंचाईमुळे उत्पादनावर मर्यादा यायच्या. पण शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्यानंतर आधुनिक सिंचन प्रणाली बसवता आली. त्यामुळे पाणी बचत तर होतेच, पण फळबाग लागवडीतही चांगले उत्पादन मिळत आहे. या योजनांमुळे आमच्या शेतीचा दर्जाच बदलला आहे. शेतीत नावीन्य आणल्यास आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतकरी अधिक सक्षम होऊ शकतो, हे माझ्या अनुभवातून दिसून आले आहे.
- गणेश सोले – प्रगतशील शेतकरी, अरणगाव ता. जमाखेड