जामखेड: जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना संघटनेच्या भावी वाटचालीचा आराखडा मांडण्यात आला. याच वेळी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सभेत अध्यक्षपदी सुदाम वराट (श्री साकेश्वर विद्यालय, जामखेड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी संतोष पवार (श्री नागेश विद्यालय, जामखेड) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी शेख जाकिर (न्यू इंग्लिश स्कूल, पाटोदा) व कदम सुर्यकांत (जिजामाता माध्यमिक विद्यालय, घोडेगाव) यांची निवड करण्यात आली.
तसेच सहसचिव म्हणून चांगुणे भागवत (अरणेश्वर विद्यालय, अरणगाव) व भोंडवे अमोल (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा) यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी वराट हनुमंत (ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून हिशोब तपासणीसाठी येवले बाळासाहेब यांची नियुक्ती करण्यात आली.
ही कार्यकारिणी ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे, प्राचार्य बी. ए. पारखे, रमेश अडसूळ, प्राचार्य बी. के. मडके, माजी प्राचार्य दिलीप ढवळे, पी. टी. गायकवाड, मुख्याध्यापक भरत लहाने, दत्तात्रय राजमाने व जिल्हा सहसचिव मोहन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिडिएफचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य दिलीप ढवळे यांनी प्रास्ताविकातून संघटनेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी रमेश अडसूळ, बी. के. मडके व बी. ए. पारखे यांनी शिक्षक संघटनेची एकजूट व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत वराट यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन भरत लहाने यांनी व्यक्त केले.
सभेस मयूर भोसले, कसबे दत्ता, चंद्रकांत डुचे, कावळे बी. व्ही., बाजीराव गर्जे, भाऊसाहेब इथापे, गुट्टे एस. एस., साळुंखे महादेव, अर्जुन रासकर, सुभाष बोराटे, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, मुकुंद वराट, घाडगे सुनील, मुजावर अफसर, शिंदे बी. एस., पवार शहाजी यांसह तालुक्यातील अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेत संघटनेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे हक्क व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सक्रियपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नूतन कार्यकारिणीला उपस्थित शिक्षकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत आगामी कार्यकाळासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.










