जामखेड: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा विचार करून शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आदेश निर्गमित करत शासनाच्या परिपत्रकानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम २५ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्यानेही जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या परिस्थितीत १५ व १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यकता भासल्यास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तथापि, सुट्टी जरी जाहीर झाली तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक असून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहभागी होणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहावे, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक त्या खबरदारी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.