वॉटरपार्कला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कार अपघातातील जखमी कार चालकाची मृत्यूशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

जामखेड: जामखेड–कर्जत रोडवरील भीषण अपघाताला अखेर दुर्दैवी वळण लागले असून, या अपघातातील गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशोक बाळासाहेब कोल्हे (रा. चिंचपूर, ता. आष्टी, जि. बीड) असे मृत चालकाचे नाव असून, दोन दिवसांपासून अहिल्यानगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अशोक कोल्हे हे चारचाकी वाहन (एमएच-१६ बीव्ही ०१०४) चालवत जामखेड येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अकलुज येथील वॉटरपार्कला घेऊन जात होते. जामखेड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड–कर्जत रोडवरील रत्नदीप मेडिकल कॉलेजजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

क्षणातच कारने दोन ते तीन पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबाला धडक दिली व बाजूच्या तारेच्या कंपाउंडला तोडत आतमध्ये घुसली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले व तातडीने रुग्णालयात हलवले.

या अपघातात चालकासह एकूण आठ जण जखमी झाले होते. यात काहींना किरकोळ दुखापत झाली, तर काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाले होते. जखमींमध्ये श्रेयश प्रल्हाद राजगुरू (रा. जामखेड) व चालक अशोक कोल्हे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले होते.

अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर अशोक कोल्हे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, इतर जखमींपैकी काहींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन दिवसांची झुंज अखेर अपयशी

गंभीर जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आलेल्या चालक अशोक कोल्हे यांनी दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

error: