जामखेड: खर्ड्यात स्मशानभूमी स्वच्छतेचा प्रेरणादायी उपक्रम; ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराच्या पुढाकाराने बदलली ईट रोडची अवस्था

Spread the love

जामखेड: खर्डा शहरातील ईट रोड परिसरातील स्मशानभूमीची झालेली दयनीय अवस्था पाहता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ खर्डा परिवाराच्या वतीने व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अनेक दिवसांपासून येथे प्लास्टिक कचरा, कॅरीबॅग, काचांच्या बाटल्या, कुजलेली लाकडे, बांबूचे तुकडे, झुडपे, गवत, टाकाऊ कपडे आणि इतर घाण साचल्यामुळे परिसर अत्यंत अस्वच्छ व दुर्लक्षित झाला होता.

या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने पुढाकार घेतला आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेतली. या अभियानात शहरातील युवक, महिला, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करत कचरा हटवला, झुडपे साफ केली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ व सुटसुटीत केला.

या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रवी कुलकर्णी, गणेश जोगदंड, महेश लोंढे, प्रकाश सोनटक्के, डॉ. अमोल वडे, गोकुळ गोलेकर, राजेंद्र चव्हाण, धनसिंग साळुंखे, संतोष साबळे, विशाल गोलेकर, जावेद सय्यद, विकास पवार, निलेश यादव, कल्याण सुरवसे, ज्ञानेश्वर इंगोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. महिला साधकांमध्ये वैशाली थोरात, मनीषा कुलकर्णी, जया जोगदंड यांचाही उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.

स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर याच स्मशानभूमी परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी भजन व सत्संग आयोजित करून स्वच्छतेसोबतच मानसिक व आध्यात्मिक शुद्धतेचाही संदेश दिला. स्मशानभूमीसारख्या गंभीर ठिकाणी भजन-सत्संगाचा हा आगळावेगळा उपक्रम ठरला असून, नागरिकांमध्ये याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

या उपक्रमामुळे केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. “सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असा संदेश या अभियानातून देण्यात आला. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

error: