“त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात…”, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

Spread the love

जामखेड | अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अत्यंत शोकाकूल वातावरणात आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा शपथविधी अनेक अर्थांनी चर्चेचा ठरला आहे. अशातच शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते रोहित पवार यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर केलेली भावनिक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र या निर्णयाबाबत शरद पवार गटाला तसेच पवार कुटुंबातील अनेक सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. याच कारणामुळे पवार कुटुंबातील कुणीही या शपथविधीला उपस्थित राहिले नव्हते.

दरम्यान, आज सकाळी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना किंवा निमंत्रण नव्हते, असे स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांची शेवटची इच्छा पूर्ण करणे हीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्या शुभेच्छांमागील वेदनाही शब्दांत मांडली.

रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही; पण किमान सुनेत्राकाकींच्या रूपात तरी आम्हाला तिथे अजितदादा दिसतात.”

पुढे ते म्हणाले, “डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हेच कळत नाही…!”रोहित पवार यांच्या या भावनिक पोस्टमुळे पवार कुटुंबातील दुःख, संभ्रम आणि राजकीय परिस्थितीतील गुंतागुंत पुन्हा एकदा समोर आली आहे. शोक, जबाबदारी आणि राजकारण यांचा अनोखा संगम असलेला हा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Leave a Comment

error: