शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या २२ व्या हप्त्याची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार २ हजार रुपये

Spread the love

मुंबई: देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपणार असून येत्या १३ मार्च रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी २२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता जमा होईल, अशी चर्चा सुरू होती; मात्र तसे झाले नाही. आता होळीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून २ हजार रुपयांचा २२ वा हप्ता थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

याबाबतची अधिकृत माहिती कृषी विभागाच्या अधिकृत X (Twitter) हँडलवर पोस्ट करून देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, १३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन टप्प्यांत म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिली जाते. आता २२ व्या हप्त्याच्या घोषणेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

हप्ता आला का? असा तपासा स्टेटस

पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे शेतकरी सहज तपासू शकतात. यासाठी अधिकृत पीएम-किसान वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकल्यास हप्त्याची माहिती पाहता येते.

तसेच लाभार्थी आगामी हप्त्यासाठी पात्र आहेत की नाही हे तपासण्यासाठी लाभार्थी यादी ऑनलाइन तपासू शकतात.लाभार्थी यादी पाहण्यासाठी Beneficiary List या विभागात जाऊन आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा (तालुका), ब्लॉक आणि गाव निवडा. त्यानंतर Submit वर क्लिक केल्यास संबंधित गावातील लाभार्थ्यांची यादी आणि हप्त्याची माहिती पाहता येते.

Leave a Comment

error: