सिंधुदुर्ग| नगरपरिषद, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही बिनविरोध निवडींचा ट्रेंड ठळकपणे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मतदानाआधीच मोठा राजकीय विजय मिळवला आहे. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, जिल्ह्यातील ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. मात्र कोकिसरे मतदारसंघातून भाजप वगळता कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने नकाशे यांचा विजय निर्विवाद ठरला. साधना नकाशे यांनी भाजपतर्फे दोन अधिकृत अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी डमी अर्ज दाखल केला होता.
या मतदारसंघातून ठाकरे गटाची शिवसेना, मनसे, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी उमेदवार न उतरवल्याने भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध एन्ट्री ठरल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
बिनविरोध निवडीची घोषणा होताच वैभववाडी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवक मोर्चा तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी सांगितले की, “हा विजय केवळ बिनविरोध निवडीचा नसून, गेल्या काळात भाजपच्या माध्यमातून तालुक्यात राबवण्यात आलेल्या विकास कामांवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचा विजय आहे. वैभववाडी पंचायत समितीत भाजपने खाते उघडल्याने आगामी काळात तालुक्याचा विकास अधिक गतीने साधता येईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
साधना नकाशे यांच्या बिनविरोध निवडीमुळे वैभववाडी पंचायत समितीत भाजपची उपस्थिती अधिक मजबूत झाली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठे राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या विजयामुळे संपूर्ण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.










