जामखेड : मोठ्या अधिकार्यांशी ओळखी आहेत, नोकरी लावून देतो” असे आमिष दाखवत तब्बल पाच लाख रुपयांना गंडा घालणारा आणि गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर खर्डा पोलिसांच्या कसोशीच्या प्रयत्नांना सापडला आहे. मुंबईतील नवी मुंबई भागातून खर्डा पोलिसांनी आरोपीला अटक करून खर्डा येथे आणले.
सन २०१७ मध्ये खर्डा येथील उत्तम रामभाऊ थोरात यांच्या मुलाला रायगड जिल्ह्यातील माणगाव तहसील कार्यालयात लिपिक पदावर नोकरी लावतो, असे आश्वासन आरोपी मुरलीधर धर्मा नेटके (रा. भोंजा, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रा. सीबीडी बेलापूर, पनवेल) याने दिले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने गोड बोलून आणि मोठ्या अधिकार्यांशी ओळखी असल्याचे सांगून थोरात कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेतले. इतकेच नव्हे तर, बनावट नियुक्तीपत्र देऊन थोरात कुटुंबाची फसवणूक केली आणि पसार झाला.
या प्रकरणी २९ डिसेंबर २०२३ रोजी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपी ठावठिकाणा बदलून पळत राहिल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी विशेष पथक तयार करून गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू ठेवला. अनेक महिन्यांच्या शिताफीने अखेर मुरलीधर नेटके मुंबईत नवी मुंबई परिसरात सापडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला खर्डा येथे आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी पथकासह मेहनत घेतली.
या कारवाईत पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पो. काॅ. पंडीत हंबर्डे, शशी म्हस्के, अशोक बडे, बाळु खाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.