जिल्हा परिषद शाळा हळगावची एनएमएमएस परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता आठवीतील १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Spread the love

जामखेड: जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जिल्हा परिषद शाळेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. इयत्ता आठवीतील तब्बल १३ विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये चक्रधर ढवळे, ओमराजे ढवळे, शिवराज ढवळे, कृष्णा कापसे, सौरव डांगरे, प्राची ढवळे, श्रेया ढवळे, सिद्धी ढवळे, आयशा सय्यद, श्रावणी कापसे, चंद्रकला ढवळे, प्रियांका ढवळे आणि सावली पुराणे यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेच्या गुणवत्तेची साक्ष दिली.

विशेष म्हणजे, यावर्षीच इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला असून, अल्पावधीतच विद्यार्थ्यांनी परिश्रमांची पराकाष्ठा करत गुरुवर्य सचिन कदम सर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हे घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील शाळेने अल्प सुविधांमध्ये साधलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल मुख्याध्यापक हजारे सर, केंद्रप्रमुख बडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी गाडेकर मॅडम तसेच गटशिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपकजी ढवळे, उपाध्यक्ष शकील भाई तसेच सदस्य ज्ञानदेव ढवळे, नवनाथ ढवळे, अविनाश ढवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

आपल्या मनोगतात ज्ञानदेवजी ढवळे यांनी शाळेच्या सातत्यपूर्ण यशाचा गौरव करत गावासाठी निस्वार्थीपणे कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. लवकरच शाळेसाठी नवीन इमारत उभारण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला. अध्यक्ष दीपकजी ढवळे यांनी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होणे हा गावाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण असल्याचे नमूद केले.

शेवटी आभार प्रदर्शन करताना सचिन कदम सरांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व ही प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

एकंदरीत, जिल्हा परिषद शाळा हळगावचा शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, गुणवत्तेबरोबरच विविध क्षेत्रांतील यशामुळे शाळेची कीर्ती सर्वदूर पसरत आहे.

शाळेची सातत्यपूर्ण कामगिरी

गतवर्षी सलग दोन वर्षे विज्ञान मॉडेल स्पर्धेत क्रमांक पटकावणे, तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत आठ खेळ प्रकारांमध्ये प्रथम येत जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करणे, अशी उल्लेखनीय कामगिरी शाळेने केली आहे. तसेच इस्रो परीक्षेत कु. चक्रधर केशव ढवळे याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत केरळ राज्यातील थुंबा येथील प्रक्षेपण स्थळी भेट देण्याची संधी मिळवली होती. त्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.

Leave a Comment

error: