कार्यकर्त्यांनो लागा तयारीला! जिल्हा परिषदा–पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने जाहीर केले वेळापत्रक; वाचा सविस्तर

Spread the love

जामखेड|गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळत आहे. राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका आता काही महिन्यांत पार पडणार आहेत. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच महत्त्वाचा निर्णय देत राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व रखडलेल्या निवडणुका पार पाडणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून पुढील काही दिवसांत प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

https://www.instagram.com/p/DO_PGZ1CP-5/?igsh=NmE5aGJqNDdxMGFy

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका या टप्प्यात होणार असून, त्यामधून भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळण्यात आले आहेत.

प्रभाग रचना पूर्ण, मतदार यादीचे काम सुरू

ग्रामविकास विभागाने नुकतीच जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समित्यांच्या गणांची प्रभाग रचना पूर्ण केली आहे. या रचनेनंतर आता मतदार यादी व मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी 1 जुलै 2025 रोजीच्या विधानसभा मतदार यादीला आधार मानले जाणार आहे.

निवडणुका कधी होणार?

या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला स्पष्ट कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार, 8 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यावर विचार करून सुधारणा करण्यात येतील आणि अखेरीस 27 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

या अंतिम मतदार यादीनंतर काही दिवसांतच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका पार पडतील, तर जानेवारी महिन्यात महापालिकांच्या निवडणुकांचे रणांगण रंगणार आहे.

पुढील काही महिन्यांत रंगणार राजकीय लढाई

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका थेट विकासाशी निगडीत असल्यामुळे स्थानिक पातळीवरही उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणुका शहरी भागातील राजकीय समीकरणे बदलणाऱ्या ठरणार असल्याने पुढील काही महिने राज्यात निवडणुकीची प्रचंड लगबग पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment

error: