जामखेड|कर्जत रोडवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या दोन दिवसांपूर्वी उसाच्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा याच रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलची धडक बसून दोन युवक गंभीर जखमी झाले असून, दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.
ही घटना जामखेड शहरातील अहिल्यावस्ती, कर्जत रोड येथे घडली. जखमी झालेल्यांची नावे भाऊसाहेब पद्माकर लबडे (वय ४५, रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि जालिंदर तुळशीराम सांगळे (वय ४६, मुक्काम पोस्ट कवडगाव, ता. जामखेड) अशी आहेत. हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना अंधारामुळे समोर असलेली ट्रॅक्टर ट्रॉली न दिसल्याने थेट धडक बसली.
अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून पाय मोडले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.विशेष म्हणजे, ३१ जानेवारी रोजी याच कर्जत रोडवर उसाने भरलेल्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून अविनाश विक्रम आढाव (वय ३०, रा. धानोरा) या तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने पुन्हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
साध्य मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू असून, अवजड ट्रॅक्टर ट्रॉलींना ना रिफ्लेक्टर, ना योग्य लाईट्स, ना वेग नियंत्रण आहे. रात्रीच्या वेळी हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे.या सततच्या अपघातांमुळे संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, तातडीने वाहतूक नियंत्रण, रस्त्यावर प्रकाशव्यवस्था, ट्रॅक्टर ट्रॉलींसाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.