जामखेड : जामखेड येथील कर्जत रोडवर ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. उसाने भरलेल्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीखाली मोटारसायकल अडकल्याने हा अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अविनाश विक्रम आढाव (वय ३०, रा. धानोरा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे आहे. अविनाश हे मोटारसायकलवरून जामखेड तालुक्यातील कर्जत रोडने प्रवास करत होते. यावेळी समोरून जाणाऱ्या उसाने भरलेल्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट ट्रॉलीखाली गेली.अपघातानंतर अविनाश सुमारे १०० फूट रस्त्यावर फरपटत गेल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पायाला जबर मार बसून पाय तुटून बाजूला पडला. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात अपघात न आल्याने ट्रॅक्टर काही अंतर पुढे गेला. यामुळे अविनाश यांच्या पायाचा चेंदा झाला आणि त्यांची अवस्था अत्यंत गंभीर बनली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन अविनाश यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या अपघातामुळे धानोरा गावासह जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. अविनाश आढाव हे तरुण, कष्टकरी व कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले जात असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान, जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत असून अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.