फोनवर बोलण्यास नकार दिल्याचा सूड उगवत मध्यरात्री कोयत्याने सपासप वार; नृत्यांगना गंभीर जखमी
जामखेड | “तु माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केलास?”या एका प्रश्नातून उसळलेल्या विकृत रागाने मध्यरात्री रक्तरंजित रूप घेतले. प्रेम नाकारल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने सपासप वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना जामखेड शहरात घडली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय 26, व्यवसाय नृत्यांगना, मूळ रा. वाघोली, जि. पुणे; सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहिल्यानगर) ही आपल्या मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात वास्तव्यास होती. गायत्री व आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्यात मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र 2024 पासून हे संबंध संपुष्टात आले होते. याचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुरुवार दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता आरोपी राहुल कचरे याने गायत्रीला फोन केला. “तु माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. नाही बोललीस तर तुला मारीन,” अशी थेट धमकी देण्यात आली. घाबरलेल्या गायत्रीने फोन कट करून आरोपीचा नंबर ब्लॉक केला. मात्र याच गोष्टीने आरोपी अधिकच चवताळला.
शुक्रवार दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा राग हिंसक रूप धारण करून समोर आला. गायत्री ही आपल्या रूममध्ये मैत्रीण मनिषासोबत असताना आरोपी राहुल हा बाल्कनीत दबा धरून बसलेला होता. मनिषा बाल्कनीत गेल्याची संधी साधत आरोपी थेट रूममध्ये घुसला. त्याच्या हातात धारदार कोयता होता.“तु माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केलास?” असे ओरडत आरोपीने गायत्रीवर कोयत्याने बोटांवर, हातावर आणि डोक्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने गायत्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.
ही भयावह दृश्य पाहून मैत्रीण मनिषा जावळे हिने आरोपीला हात जोडून “मारू नको” अशी विनवणी केली. मात्र संतप्त आरोपीने शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार आहे,” अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी गायत्री तुषार सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत.