हप्ता खात्यात आला; पण पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘येवढे’ शेतकरी वगळले, तुमचे नाव तर नाही ना?

Spread the love

जामखेड: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. या हप्त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४२ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १०८ कोटी ५० लाख २८ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, या हप्त्यात मागील वेळेपेक्षा १ हजार ४८७ शेतकरी कमी झाल्याची बाब समोर आली आहे.

यापूर्वी २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्या वेळी जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार १ शेतकऱ्यांच्या खात्यात १०८ कोटी ८० लाख २ हजार रुपये जमा झाले होते. त्यावेळीही पात्रता तपासणीदरम्यान ४ हजार ५५८ शेतकरी योजनेतून वगळण्यात आले होते.

दरम्यान, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत पात्रता तपासणीची कडक प्रक्रिया लागू केली आहे. यामध्ये आधार लिंकिंग, अनिवार्य ई-केवायसी, जमीन नोंदणी पडताळणी तसेच डुप्लिकेट लाभार्थ्यांची तपासणी या प्रक्रियेमुळे अनेक अपात्र नोंदी उघडकीस आल्या. त्यामुळे २२ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन ५ लाख ४२ हजार ४८७ इतकी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

योजनेच्या नियमांनुसार पती-पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलांना मिळून एकच कुटुंब मानले जाते आणि त्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी या नियमाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघांनीही स्वतंत्र नोंदणी केली होती, तर काही प्रकरणांमध्ये मुलांच्या नावावर जमीन असल्याने त्यांनाही लाभ मिळत होता.

ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर मोठी पडताळणी मोहीम राबवण्यात आली. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त नोंदी आढळल्यास त्या रद्द करून फक्त एका व्यक्तीलाच लाभ देण्याची पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो अपात्र नोंदी फिल्टर झाल्या आहेत.

दरम्यान, पात्र शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि जमीन नोंदणी पडताळणी वेळेत पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांमध्येही लाभ थांबण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

पीएम किसान लाभार्थी यादी कशी तपासाल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही हे शेतकरी ऑनलाइन पद्धतीने सहज तपासू शकतात. यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. होमपेजवरील Farmers Corner विभागात जाऊन Beneficiary List या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा/तहसील, ब्लॉक तसेच गाव किंवा ग्रामपंचायत निवडून Get Report या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर दिसते. या यादीत नाव, पित्याचे नाव, गाव व इतर माहिती तपासता येते. जर यादीत नाव आढळले, तर Know Your Status किंवा Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याच्या आधारे हप्ता जमा झाला आहे की नाही याचीही खात्री करता येते.

हप्ता न मिळाल्यास काय कराल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा झाला नसल्यास शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन “Beneficiary Status” या पर्यायातून आपली माहिती तपासावी. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्ता जमा झाला आहे की नाही याची खात्री करता येते. जर हप्ता जमा झाला नसेल तर आधार लिंकिंग, ई-केवायसी, बँक खात्याची माहिती व जमीन नोंदणीची माहिती अद्ययावत आहे का हे तपासणे आवश्यक आहे. कोणतीही त्रुटी आढळल्यास जवळच्या सेवा केंद्रात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती दुरुस्त करून घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

error: