लोकन्यायालयात तुटलेले नाते पुन्हा जुळले; तीन वर्षांच्या चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे पुन्हा एकत्र छत्र

Spread the love

जामखेड : जामखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात पोटगीसाठी प्रलंबित असलेले एक कौटुंबिक प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले. न्यायाधीश व वकिलांच्या मध्यस्थीमुळे मंदा सुरेश कुमटकर या पती सुरेश अशोक कुमटकर यांच्यासोबत पुन्हा नांदायला गेल्याने तुटलेले कुटुंब एकत्र आले असून त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला पुन्हा आई-वडिलांचे छत्र मिळाले आहे.

जामखेड येथील न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा जलद आणि सामोपचाराने निपटारा करण्यावर विशेष भर देण्यात आला. याच लोकन्यायालयात पती-पत्नीमधील पोटगीच्या दाव्याशी संबंधित एक कौटुंबिक प्रकरण अत्यंत सकारात्मक पद्धतीने निकाली काढण्यात आले.

मंदा कुमटकर आणि सुरेश कुमटकर यांच्यात काही कारणांमुळे वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. या दाम्पत्याला ‘श्रद्धा’ नावाची तीन वर्षांची मुलगी आहे. पोटगीच्या दाव्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र लोकन्यायालयाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांच्यात समजूत काढण्यात आली आणि संसार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश श्रीमती यू. ए. भोसले आणि न्यायाधीश श्रीमती ए. बी. फंड यांनी दोन्ही पक्षांना संसाराचे महत्त्व पटवून देत समेटाचा मार्ग सुचवला. त्यानंतर दोघांनीही सकारात्मक भूमिका घेत पुन्हा एकत्र राहण्यास सहमती दर्शवली.

या तडजोडीत अर्जदार पक्षाचे वकील जे. एम. कोल्हे तसेच प्रतिस्पर्धी पक्षाचे वकील हर्षल डोके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासोबत वकील अमीर पठाण, वकील कल्पेश गायकवाड आणि साद शेख यांनीही मध्यस्थी प्रक्रियेत सहकार्य केले.

दरम्यान, न्यायालयीन कामकाजात कोर्ट कर्मचारी येडे भाऊसाहेब व अमिना भाऊसाहेब यांनी प्रशासकीय जबाबदारी सांभाळली. विधी सेवा समितीचे ढगे भाऊसाहेब तसेच पॅनल सदस्य ॲड अशोक थोरात आणि ॲड अशोक कुंभार यांनीही या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतला.

या तडजोडीमुळे तीन वर्षांच्या श्रद्धाला पुन्हा आई-वडिलांचे एकत्रित प्रेम आणि आधार मिळाला आहे. लोकन्यायालयामुळे केवळ खटलेच मिटत नाहीत, तर विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. या यशस्वी मध्यस्थीबद्दल न्यायालय परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: