आधी धनंजय मुंडे, नंतर कोकाटे आता चाकणकर

Spread the love

वादात अडकल्याने राजीनामा; राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटाची तिसरी विकेट

जामखेड : महायुती सरकारच्या कार्यकाळात वादग्रस्त प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्यांना पद सोडावे लागण्याची मालिका कायम असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी सायंकाळी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे सरकारच्या कार्यकाळातील वादामुळे झालेली ही तिसरी मोठी राजीनाम्याची घटना ठरली आहे.

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुन्हा एकदा बचावाच्या भूमिकेत गेल्याचे दिसत आहे.

या आधी माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना वादाच्या भोवऱ्यात अडकून पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वाल्मीक कराड यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मार्च महिन्यात कृषिमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर वादामुळे मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ती पहिलीच घटना होती. कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांमुळेही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राजीनाम्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही.

मुंडे यांच्या जागी कृषिमंत्रीपदी आलेल्या माणिकराव कोकाटे यांनाही वादांचा फटका बसला. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना कृषी खात्यावरून हटवून क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आले होते. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट प्रकरणात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि त्यानंतर कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर कृषिमंत्रिपदाची जबाबदारी दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली.

आता रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे या मालिकेत आणखी एक भर पडली आहे. सलग तीन घटनांमुळे महायुती सरकार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर विरोधकांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकरणांचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोंदूबाबा प्रकरणात आणखी एक राजीनामा

भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी असलेले निकटचे संबंध अखेर रूपाली चाकणकर यांना महागात पडले. या प्रकरणावरून वाढलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास ही खाती काही काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. सध्या ही जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील वादामुळे पद गमावणाऱ्या नेत्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा आणि सरकारवरील दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment

error: