बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत; जामखेड तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा, ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ची जोरदार गर्जना

Spread the love

जामखेड |राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि. २६ सप्टेंबर) रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी जमून घोषणाबाजी केली आणि शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. त्यांनी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन सादर केले. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, “बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे वाहून गेली, जीवनावश्यक वस्तूंची हानी झाली, तर माणसाबरोबर जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने गावोगावी प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीची मदत जाहीर करावी.”

या आंदोलनावेळी लोक अधिकार आंदोलनाचे राज्य प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ यांनीही शासनाला जाब विचारला. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केली, पण मुसळधार पावसामुळे केलेला संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे. शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शासनाने तातडीने जामखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून मदत केली नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरेल.”

आंदोलनात वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, आझाद क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव फुले, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, रेश्मा बागवान, कृष्णा मोरे, नागेश फुले, प्रवीण गायकवाड, अनिल कांबळे, योगेश फुले, संदीप सांगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारकडून तातडीची मदत मिळावी, अशी जोरदार मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून त्याने हाहाकार माजवला आहे. जामखेड तालुक्यात तर पावसाने उच्चांक गाठला असून सोयाबीन, कांदा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत, घरांचा संसार वाहून गेला असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण राज्य ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई मिळावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडी व लोक अधिकार आंदोलनाने केली.

Leave a Comment

error: