जामखेड : सहकार क्षेत्रात सक्रिय, अभ्यासू व संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे यांची सहकार भारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
लोणावळा येथे पार पडलेल्या सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या वेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीशजी मराठे, राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर, प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चाळके, महामंत्री विवेक जुगादे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजिनाथ हजारे हे ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी संस्थेला शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धती दिली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार देत सहकाराच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
हजारे यांच्या निवडीचे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बैठकीत राज्यभर सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून ग्रामीण व शहरी विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“सहकार भारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘विना संस्कार नाही सहकार, बिना सहकार नाही उद्धार’ या तत्वावर चालत जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यावर भर दिला जाईल. सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हता वाढवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे प्राधान्य राहील.”
- अजिनाथ हजारे – नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, सहकार भारती










