जामखेड : दिवाळीचा सण जवळ आला असताना, प्रत्येक घरात आनंदाची तयारी सुरू असते. पण याच सणाच्या उंबरठ्यावर जामखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या घरात मात्र शोककळा पसरली आहे. अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि नापिकीच्या चक्रात सापडलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जामखेड तालुक्यातील पारेवाडी (अरणगाव) येथे घडली आहे.
पारेवाडी येथील महादेव कुंडलीक राऊत (वय ५५ वर्षे) या अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, दिवाळीच्या ऐन तोंडावर बळीराजाने घेतलेले हे टोकाचे पाऊल सर्वांना चटका लावणारे ठरले आहे.
राऊत हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या मालकीची अवघी तीन ते चार एकर शेती होती. या वर्षीच्या अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील सर्व पिके पूर्णपणे नष्ट झाली. हातातोंडाशी आलेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. गेल्या काही महिन्यांपासून ते सतत कर्जबाजारीपणामुळे चिंतेत होते. नापिकी, वाढता खर्च आणि उत्पन्नाचा अभाव या तिहेरी ताणाखाली ते झगडत होते. परतीच्या पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले, आणि अखेरीस त्यांनी शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर राऊत यांच्या घरी आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. दिवाळीसारख्या सणाच्या उंबरठ्यावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळून गेला आहे.
दरम्यान, जामखेड तालुक्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. शेतांमध्ये उभी पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर अद्याप शासनाकडून दिवाळी पूर्वी मिळणारी मदत देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.