जामखेडमध्ये भाजपचा धडाकेबाज मास्टरस्ट्रोक! युवा नेतृत्वाची कमान प्रशांत शिंदेकडे; जिल्हा परिषद निवडणुकीत ‘शिंदे फॅक्टर’ ठरणार हॉट

Spread the love

जामखेड: जामखेड तालुक्यातील युवा नेतृत्व आणि प्रभावी संघटक म्हणून ओळख असलेले प्रशांत शिंदे यांची आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असून, तालुक्यात भाजपने पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रशांत शिंदे हे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांनी २०१४ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे.

तालुकाध्यक्षपदाची ही निवड केवळ पदभरती नसून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपची रणनीती अधिक स्पष्ट करणारी ठरते. जवळा जिल्हा परिषद गटात सौ. शितल प्रशांत शिंदे यांची उमेदवारी चर्चेत असताना, प्रशांत शिंदे यांच्याकडे तालुक्याच्या युवा नेतृत्वाची धुरा देणे म्हणजे पक्षाने शिंदे कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचा स्पष्ट संकेत आहे.

शितल शिंदे सध्या जवळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कार्यरत असून, त्यांचे कामकाजही स्थानिक पातळीवर गौरवले जात आहे. त्यातच आता प्रशांत शिंदे यांची तालुकाध्यक्षपदी झालेली निवड, ही त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वाटचालीतील आणखी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

शिंदे कुटुंबाचा जवळा गावातील आणि जामखेड तालुक्यातील राजकारणावर दीर्घकाळापासून प्रभाव आहे. प्रशांत शिंदे यांच्या भावजयी सौ. वैशाली सुभाष शिंदे यांनीही २०१३ मध्ये जवळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर २०१८ मध्ये सरपंचपदाची धुरा सांभाळत त्यांनी गावात महत्त्वपूर्ण विकासकामे राबवली. या निवडीमुळे प्रशांत शिंदे यांचे राजकीय वजन निश्चितच वाढले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे कुटुंबाचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

जवळा हे जामखेड तालुक्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते. या गावाने आजवर भारतीय जनता पक्षाला सातत्याने भक्कम साथ दिली आहे. प्रशांत शिंदे यांच्या सौभाग्यवती शितल प्रशांत शिंदे सध्या जवळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कार्यरत असून, गेल्या दहा वर्षांपासून जवळा ग्रामपंचायतीवर शिंदे कुटुंबाचे वर्चस्व असून, ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विविध कार्यकारी सोसायट्यांपर्यंत स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक राजकारणात आपली मजबूत पकड सिद्ध केलेली आहे. एकुणच गावचा कारभार प्रशांत शिंदे या तरूण युवा नेत्याच्या भोवती केंद्रित आहे. यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने योग्य व्यक्तीला संधी दिली असून, प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा अधिक प्रभावीपणे काम करेल, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: