जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ३ गट व पंचायत समितीच्या ६ गणांची आरक्षण सोडत आज
जामखेड : जामखेड तालुक्यात आज दुपारी जिल्हा परिषदेच्या ३ गट आणि पंचायत समितीच्या ६ गणांची आरक्षण सोडत पार पडणार आहे. या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे, विशेषतः स्थानिक राजकीय इच्छुकांचे लक्ष लागले आहे. कोणत्या गटात कोणते आरक्षण लागू होणार, यावर अनेक विद्यमान व माजी सदस्यांचे तसेच नव्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांसाठी तहसील कार्यालयात आज (दि. १३ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गटासाठी मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी असून संपूर्ण प्रक्रियेवर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची देखरेख राहणार आहे.
सोडतीनंतर उद्या (दि. १४ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी मिळणार आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत या हरकती सादर करून त्यांचा गोषवारा विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. विभागीय आयुक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर करतील. अंतिम आरक्षण ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणुकीचा मार्ग औपचारिकपणे मोकळा होईल.
राजकीय चर्चेला उधाण
आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कोणत्या गटात महिला आरक्षण लागू होणार? कोणत्या गटातून अनुसूचित जाती किंवा मागास प्रवर्गाला संधी मिळणार? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक सकाळपासूनच प्रशासन कार्यालयांवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. काहींच्या अपेक्षेप्रमाणे आरक्षण लागल्यास त्यांची ‘लॉटरी’ लागेल, तर काहींच्या स्वप्नांचा चुराडा होणार, अशी परिस्थिती आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सोडतीनंतर स्थानिक पातळीवर उमेदवारीचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. अनेक नेते नव्या गटात नशिब आजमावण्याचा प्रयत्न करतील, तर काहींना आपले राजकीय भविष्य पुन्हा शून्यापासून उभारावे लागेल.