कर्जत–जामखेडच्या ५ ग्रामपंचायतींना ‘मातोश्री’ योजनेतून १ कोटीचा निधी; प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

जामखेड : ग्रामीण भागात आधुनिक, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख ग्रामपंचायती उभ्या राहाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने” अंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाच ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये असा एकूण १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.

या योजनेचा लाभ मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कर्जत तालुक्यातील नांदगाव, निंबे आणि वडगाव तनपुरा तसेच जामखेड तालुक्यातील सोनेगाव आणि घोडेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीस २० लाख रुपयांचा निधी मिळणार असून या रकमेच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनासाठी आधुनिक, सुसज्ज आणि तंत्रज्ञानाधारित इमारती उभारल्या जाणार आहेत.

“मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” ही राज्य शासनाची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना केवळ प्रशासनिक केंद्र म्हणून नव्हे तर नागरिक सेवांचे सशक्त केंद्र म्हणून विकसित करण्याचा या योजनेचा हेतू आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींसाठी आधुनिक प्रशासकीय इमारतींचे बांधकाम, डिजिटल तंत्रज्ञान सुविधा, ग्रामसेवकांसाठी सुसज्ज कार्यालयीन जागा, बैठकींसाठी सभागृह, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी सुधारित व्यवस्था उभारली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात कार्यक्षम, पारदर्शक आणि डिजिटल प्रशासनाची नवी दिशा मिळते.

या निधीच्या मंजुरीनंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामविकासाच्या दृष्टीने ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनेक ग्रामपंचायतींना अजूनही अपुर्‍या जागेत, जुन्या इमारतींमध्ये किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये काम करावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील कार्यक्षमता आणि लोकसेवा प्रक्रियेला मर्यादा येतात. नव्या इमारती उभारल्यास या समस्या दूर होऊन अधिक कार्यक्षम आणि सुसज्ज स्थानिक प्रशासन उभे राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मागील काही वर्षांपासून मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण प्रशासन या क्षेत्रात विविध विकासकामांना वेग मिळत आहे. “मातोश्री” योजनेअंतर्गत मिळालेला हा निधी त्यांच्या विकासदृष्टीला बळकटी देणारा ठरेल, असे मत स्थानिक लोकप्रतिनिधीनी व्यक्त केला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात ग्रामविकासासाठी शासनस्तरावर आणि प्रशासनिक स्तरावर चाललेले हे प्रयत्न यापुढे अधिक गतीमान होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना विकासाचे नवे पर्व सुरू होईल आणि गावकऱ्यांना सक्षम, सुसज्ज व आधुनिक ग्रामपंचायत प्रशासनाचा अनुभव मिळेल, यात शंका नाही.

Leave a Comment

error: