कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त जवळा येथे कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
जामखेड : “समाजातील कष्टकरी व ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांसाठी स्थापन केलेली रयत ही शिक्षण संस्था आहे. कुणापुढे हात न पसरता स्वावलंबी व्हावे, ही धारणा कर्मवीरांची होती. श्रमाचा जयजयकार करणारा तो महापुरुष आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांचा वारसा त्यांनी पुढे चालविला. कर्मवीरांच्या कृतींचा आणि विचारांचा वारसा घेऊन संस्थेला अनेक वटवृक्षाच्या पारंब्यारुपी सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिल्याने संस्थेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले. शिक्षणाच्या बाजारात माणसं तयार करणारा कारखानदार म्हणून कर्मवीरांची ओळख आहे” असे प्रतिपादन दादा पाटील महाविद्यालयाचे प्रा. सुखदेव कोल्हे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, जवळा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शहाजी वाळुंजकर होते. याप्रसंगी सुभाषराव आव्हाड, राजेंद्र वाळुंजकर, गौतम मते, दत्तात्रय हजारे, अनिल पवार, सत्तार शेख, जय शिंदे, अंगद रोडे, किरण हजारे प्राचार्य बाळासाहेब जोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात शहाजी वाळुंजकर यांनी सांगितले की, शाळेमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम आयोजित होत असल्याने विद्यार्थी यशस्वी ठरत आहेत. शाळेच्या प्रगतीकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केला. याप्रसंगी ऐश्वर्या टेंभाळे, प्रचिती सरडे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. यानिमित्त इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या अथर्व खाडे, जान्हवी कथले, श्रावणी वाघमारे विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब जोरे, सूत्रसंचालन संतोष सरसमकर यांनी तर आभार पर्यवेक्षक कैलास बिरंगळ यांनी मानले. या कार्यक्रमाला जवळा गावातील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.