जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५२ लाखांचा गुटखा जप्त, चालकास अटक

Spread the love

जामखेड|गुप्त माहितीच्या आधारे जामखेड पोलिसांनी (दि. २७ सप्टेंबर) रोजी पहाटे साडेचार वाजता अरणगाव शिवारात धडक कारवाई करून तब्बल ५२ लाख ९४ हजार ६४० रुपयांचा गुटखा व आयशर टेम्पो जप्त केला. या कारवाईत वैभव अशोक घायाळ (२६, रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, माहीजळगावकडून केशरी रंगाचा महिंद्रा कंपनीचा सहा चाकी कंटेनर गुटखा घेऊन येत आहे. तत्काळ पोलीस पथक तयार करून अरणगावमध्ये नाकेबंदी लावली.

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयित आयशर टेम्पो (MH-12 YB-0823) अरणगावकडे येताना पोलिसांना दिसला. टेम्पो थांबवून चौकशी केली असता चालकाने स्वतःचे नाव वैभव अशोक घायाळ असे सांगितले व टेम्पोत गुटखा असल्याची कबुली दिली.

यानंतर टेम्पो जामखेड पोलिस ठाण्यात आणून सपोनि नंदकुमार सोनवलकर यांनी दोन पंचासमक्ष तपासणी केली. तपासणीत हिरा कंपनीचा पान मसाला, गुटखा व तंबाखू मिळून ३४,९४,६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला. आयशर टेम्पोची किंमत १८ लाख रुपये असल्याने एकूण ५२,९४,६४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप पांडुरंग घोळवे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदणी क्रमांक ५२७/२०२५, भा.दं.वि. कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.

ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. वैभव कलुबमें (अप्पर पोलीस अधीक्षक), मा. प्रविणचंद्र लोखंडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत), मा. किरणकुमार कबाडी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

error: