जामखेड : कर्जत-जामखेडकरांना हिरवाईचा नवा श्वास मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कर्जत नगरपंचायतसाठी १ कोटी आणि जामखेड नगरपरिषदेसाठी १ कोटी असा हा निधी असून, याच रकमेतून दोन्ही शहरांमध्ये भव्य ‘नमो उद्यान’ उभारले जाणार आहे.
या उद्यानात मुलांसाठी खेळणी व झोके, तर युवक व ज्येष्ठांसाठी व्यायाम साहित्य उभारले जाणार आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी आकर्षक वॉकिंग ट्रॅक, विश्रांतीसाठी खास जागा आणि भरपूर हिरवाई अशी सुसज्ज सोय येथे होणार आहे. यामुळे नागरिकांना आरोग्यदायी, शांत आणि आधुनिक जीवनशैलीचा अनुभव मिळेल.
नमो उद्यानाच्या उभारणीमुळे शहर सौंदर्यीकरणाला मोठी चालना मिळणार असून पर्यावरण संवर्धनालाही नवी दिशा मिळेल. शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होण्यास या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कर्जत-जामखेडकरांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.