सीना महापुरामुळे शेती व पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान : दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करा – सभापती प्रा. राम शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Spread the love

जामखेड: सीना नदीला आलेल्या महापुराने कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली असून फळबागा व शेतीची प्रचंड हानी झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, शाळा आणि इतर पायाभूत सुविधा बाधित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांसह प्रशासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, सितपुर, निंबोडी, मलठण, तरडगाव, दिघी, चिलवडी आणि जामखेड तालुक्यातील चोंडी या गावांना भेट देत त्यांनी नागरिकांचे मनोधैर्य वाढवले. “संकटकाळात शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवा. स्टाफ कमी पडल्यास इतर तालुक्यांतून मदत घेऊन कार्यवाही पूर्ण करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

महापुरामुळे बाधित कुटुंबांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना दिले. तसेच, पाऊस ओसरल्यानंतर नदीवरील वाहून गेलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती जलसंपदा विभागाकडून केली जाईल, अशी ग्वाही सभापती प्रा. शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या संकटात खचून जाऊ नका. एकमेकांना सहकार्य करा. लवकरच पंचनामे पूर्ण होतील आणि नुकसान भरपाईसाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”

पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, बांधकाम विभागाचे अभियंते, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, महसूल, जलसंधारण आणि इतर विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: