जामखेड: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांना त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून कार्यभार पार पाडण्याची नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आचार्य देवव्रत आज सकाळी अहमदाबाद येथून तेजस एक्सप्रेसने रवाना झाले. ते उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील राजभवनमधील दरबार हॉल येथे शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.
आचार्य देवव्रत हे सध्या गुजरात राज्याचे राज्यपाल असून यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात जन्मलेल्या आचार्य देवव्रत यांना शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आल्याने राज्याच्या प्रशासनाला स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यपालपदाची नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आचार्य देवव्रत महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेशी समन्वय साधून पुढील प्रशासनिक कार्यवाही सुरळीत करण्यासाठी कार्यरत राहतील.