जामखेड: जामखेड शहरात एक धक्कादायक घटना घडली असून येथील प्रतिष्ठित व्यवसायिक आणि मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य नाजीमोद्दीन काझी यांचा २३ वर्षीय मुलगा अमन काझी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दु:खद घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नातेवाईकांसह नागरिक हादरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन काझी हा नुराणी कॉलनी परिसरातील घोडके हॉस्पिटलच्या मागे असलेल्या घरात नेहमीप्रमाणे रात्री झोपण्यासाठी गेला होता. मात्र, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या आईने फोन लावला असता मोबाईल बंद असल्याचे दिसले. काळजीपोटी वडिलांनी नुराणी कॉलनी येथील घर गाठले असता दार उघडे होते आणि अमनचा मृतदेह पंख्याला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या हाताची नसही कापलेली दिसून आली असून ही घटना अधिक धक्कादायक ठरली.
प्राथमिक तपासात अमनने प्रथम स्वतःच्या हाताची नस कापून नंतर गळफास घेऊन जीवन संपवले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. तरीही आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे आणि सहकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आणि नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे हे तपास करीत आहेत.
अमनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून फोनचा लॉक उघडून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यास तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती न राहता संपूर्ण जामखेड शहराला हादरवून सोडणारी ठरली असून नागरिकांमध्ये तीव्र खळबळ आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.