जामखेड: जामखेड तालुक्यात अवैध शस्त्रास्त्रांच्या मालकीचे प्रकार वाढत चालले असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बटेवाडी येथील संदिप बंडु मारकड या एकवीस वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ४ सप्टेंबर रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली होती की संदिप मारकड हा जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे अवैध शस्त्र बाळगून वावरत आहे. त्यानुसार पोलिसांनी बटेवाडीत छापा टाकला असता तो कट्टा व काडतुसासह सापडला. पंचासमक्ष तपासणी केल्यानंतर त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुस असा एकूण ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस हवालदार मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून संदिप मारकड याच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पीएसआय अनंत सालगुडे, एएसआय रमेश गांगर्डे, हेड काँस्टेबल हदय घोडके आणि पोलिस नाईक शामसुंदर जाधव यांचा समावेश होता.
जामखेड तालुक्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने याविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईनंतर पुढील काही दिवसांत आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, अवैध शस्त्रधारकांच्या मुसक्या आवळल्या जाणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.