जामखेड : धर्माला जोडणारा नव्हे तर तोडणारा चेहरा बहुतेकदा दिसतो. पण जामखेड तालुक्यातील सातेफळ गावात गेली चाळीस वर्षे एक मुस्लिम कुटुंब हिंदूंच्या गौरी-गणपतीची स्थापना करत असल्याची परंपरा धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण ठरत आहे. सय्यद कुटुंबाची ही परंपरा आता संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
१९७२ च्या दुष्काळात मूळ मलकापूर (ता. परंडा) येथून उदरनिर्वाहासाठी सातेफळला आलेल्या दगडू नन्हु सय्यद यांना शेतात काम करत असताना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या. सलग चार दिवस मूर्ती त्याच ठिकाणी राहिल्याने त्या घरी आणल्या. पुढे गावातील मंदिराचे पुजारी, मौलाना आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याने या मूर्तींचे दरवर्षी गौरीपूजन करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे.
कुटुंबातील रशीद दगडू सय्यद, सुग्रबी रशीद सय्यद, मलिक रशीद सय्यद, रमजान दगडू सय्यद, जरीना रमजान सय्यद, नौशाद मलिक सय्यद, मुस्कान मलिक सय्यद आदी सर्व सदस्य एकत्र येऊन हा सण भक्तिभावाने साजरा करतात.
तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, रांगोळी, पूजा-अर्चा, फराळ व खेळण्यांची मांडणी केली जाते.हळदी-कुंकवासाठी शेकडो महिला दरवर्षी सय्यद कुटुंबाच्या घरी आवर्जून भेट देतात.
यावर्षी दगडू सय्यद यांच्या बहिणी बाशीबी जिनुर पठाण यांनी आपल्या मुलीला सून म्हणून दिले असून, माहेरून नवीन लक्ष्मी दिल्यामुळे यंदा घरात नवीन गौरीची स्थापना करण्यात आली. मुस्लिम कुटुंबंच्या या उपक्रमाचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे.