जामखेड: साळवे कुटुंबावर मारहाण प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! अटकेतील आरोपीची विरोधी फिर्याद; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

जामखेड : जामखेड तालुक्यातील नान्नज गाव पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटनांनी हादरलं आहे. साळवे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनेच आता पोलिस ठाण्यात विरोधी फिर्याद दिल्याने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

२४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता नान्नज बाजारतळावर झालेल्या हल्ल्यात साळवे कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहा जणांना अटक केली होती. त्यातीलच अटकेत असलेल्या वैभव विजय साबळे (वय २९, रा. नान्नज) याने रविवारी (३१ ऑगस्ट) जामखेड पोलिस ठाण्यात थरकाप उडवणारी फिर्याद दाखल केली आहे.

विरोधी फिर्यादीत काय म्हटलं आहे?

वैभव साबळे याने फिर्यादीत म्हटले आहे की,
तो मित्र अभयराजे भोसले याच्यासोबत ‘साईनाथ’ पानटपरीवर बसलेला असताना दिग्विजय सोनवणे व अभयराजे यांच्यात वाद झाला. त्यानंतर दिग्विजयने यशदीप साळवे याला बोलावले. त्याच्यासोबत अभिजीत, सतीश, आदर्श, रतन साळवे, अरविंद भालेराव, सद्दाम पठाण हे हातात कोयता, लोखंडी गज, बांबू घेऊन धावून आले.

या टोळीने अभयराजे भोसलेला बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साबळेवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. एवढंच नव्हे तर खिशातील दोन हजार रुपये आणि सोन्याची चेन लुटण्यात आली, तसेच पानटपरीवर दगडफेक करून फ्रीज, मोबाईलसह साहित्याची नासधूस करण्यात आली. गल्ल्यातील चार हजार रुपयेही गायब झाल्याचा धक्कादायक खुलासा या फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, साबळे घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की सुनील साळवे हा हातात बंदूक घेऊन घरासमोर आला होता. त्याने आरडाओरडा करत जीव घेण्याची धमकी दिली आणि गाडीतून पसार झाला.

१० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

यशदीप साळवे, अभिजीत भालेराव, आदर्श साळवे, शिवानी साळवे, सुनील साळवे, अभिजीत साळवे, रतन साळवे, सतीश साळवे, सद्दाम पठाण आणि अरविंद भालेराव.सर्व आरोपी फरार असून, गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत: 

१) कलम भारतीय न्याय संहिता 119(1)

२) कलम भारतीय न्याय संहिता 324(4)

३) कलम भारतीय न्याय संहिता 189(2)

४) कलम भारतीय न्याय संहिता 191(2), 191(3)

५) कलम भारतीय न्याय संहिता 190

६) कलम भारतीय न्याय संहिता 351(2), 352

Leave a Comment

error: