जामखेड : साळवे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नान्नजमध्ये कडकडीत बंद

Spread the love

जमाखेड : जमाखेड तालुक्यातील नान्नज येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने नान्नज हादरले असून मंगळवारी गावाने स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

रविवारी (२४ ऑगस्ट) रात्री नान्नजमध्ये घडलेल्या हल्ल्यात गज, तलवारी, कोयते आणि काठ्यांचा वापर करून टोळक्याने साळवे कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांवर पुणे व अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्ल्यानंतरच्या संतापाची झळ मंगळवारी प्रकर्षाने जाणवली. गावातील सर्वच लहान-मोठी दुकाने दिवसभर बंद राहिली. बंद शांततेत पार पडला, मात्र वातावरणात तणाव जाणवत राहिला. जामखेड पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याची काळजी घेतली.

सदर प्रकरणी १४ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता असून न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे. सध्या नान्नजमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Comment

error: